सोलापूरकरांना दिलासा, हुतात्मा एक्स्प्रेसला जोडले जाणार तीन कोच

सोलापूर: सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सोलापूरकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. प्रवास सुखकर व्हावा म्हणून तीन कोच लावले जाणार आहेत.
तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल असतील. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर प्रवास करता येणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला हा निर्णय लागू होणार असून, सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात रेल्वेने मेल एक्स्प्रेस गाड्यांतील साधारण डब्याची संख्या एक आणि दोन करण्यात आलेली होती. तसेच हुतात्माला जनरल डबा नसल्यामुळे वेटींग तिकीट असलेल्या आणि अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पण, जनरल डबे घोषित केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हुतात्मा एक्स्प्रेला साधारण डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अखेर ती मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे.
सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी यांच्यासाठी महत्वाची गाडी आहे. हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डी ९, डी १० आणि डीएल १ (एसएलआर) हे डबे जनरल डबे म्हणून धावणार आहेत. हुतात्मा एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. उशिरा का होईना रेल्वे प्रशासनाने जनरल डब्यांची घोषणा केल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. जनरल डब्यांमुळे गर्दी सुद्धा कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेसला दोन अनारक्षित चेअर कार व एक एसएलआर जनरल डबे जोडले जाणार असल्याने सोलापूर, कुर्डूवाडी आणि दौंड येथून पुणे, अमरावतीला जाणाऱ्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूरहून पुण्याला मोठ्या प्रमाणात प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात. त्यांच्यासाठी हे सोयीचे झाले असून, जनरल डबे जोडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेसला जनरल डबा नसल्यामुळे वेटींग तिकीट असलेल्या व अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, आता जनरल डबे घोषित केल्यामुळे या सर्व प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. तसेच रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.