…अखेर फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, शिवसेनेला ‘ही’ खाती मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार, याची माहिती देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
सत्तास्थापनेवरून राज्यातील महायुतीत बराच गदारोळ निर्माण झाला आहे. भाजप गृहखातं एकनाथ शिंदे यांना देण्यास तयार नसल्याची बरीच चर्चा आहे. पण आता केवळ गृहखातंच नाही तर भाजप शिंदे गटातील चार नेत्यांनाही मंत्रीमंडळात सामावेश करून घेण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यात अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या नेत्यांची आज सरकारमधील खाते वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाला नगरविकास, पाणी पुरवठा, कृषी, उद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, पीडब्ल्यूडी आणि रोजगार हमी खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त खाते, महिला व बालविकास खाते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे.
अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित झाले असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, मोदी-शाहांनी घेतलेला मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मान्य असेल, असे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले आहे.
माझा सत्ता स्थापन करण्यात कोणताही अडथळा नाही, भाजप घेईल तो निर्णय मला मान्य असेल, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतरही ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे, जर हे पद मिळत नसेल तर गृह, अर्थ व महसूल विभाग शिंदे गटाला मिळावे, अशी त्यांची मागणी असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर अर्थमंत्रीपद अजित पवारांना निश्चित समजले जात आहे.
राज्यात सरकार स्थापन करणे गरजेचे असताना एकनाथ शिंदे दरे गावात गेले आहेत. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पण शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याचे बोलले जात आहे. मात्र, गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसही आग्रही आहेत. भाजप वरिष्ठ मागणी पूर्ण करत नसल्याने दबाव बनवण्यासाठी शिंदे गावी गेल्याची चर्चा आहे. आता भाजप शिंदेंना गृहमंत्रीपद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेता निवडीसाठी 3 डिसेंबर रोजी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. यात गटनेता निवडला जाणार असून 5 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊन आठवडा उलटला तरीही अजूनही सरकार स्थापन झाले नाही. महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याचे कळते.
दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात आज महत्त्वाची बैठक झाली आहे. ही बैठक जवळपास एक तास सुरु होती. यामध्ये महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याआधी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत हजेरी लावली होती. दरम्यान राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे.
महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, हे अजूनही अधिकृतपणे सांगितले जात नाही. त्यातच भाजपला 2 वर्षे आणि शिंदे गटाला 2 वर्षे आणि अजित पवार गटाला एक वर्षे मुख्यमंत्रीपद दिले जाईल का ? असा सवाल विचारला जात आहे. हा थेट प्रश्न अजित पवार यांना विचारला असता त्यांनी याविषयी स्पष्ट उत्तर देणे टाळले. पण लवकरच सरकार स्थापन होणार, असे पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने 288 पैकी 230 जागा जिंकून सत्ता राखली. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या.
मात्र, 23 नोव्हेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी गुरुवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे.पी. यांची भेट घेऊन महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापनेबाबत बोलणी केल्याचे वृत्त आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. सत्ता स्थापनेच्या गदारोळात त्यांनी दोन दिवसांसाठी आपल्या दरे गावी मुक्काम हलवला आहे. किरकोळ ताप, कणकणी असल्याने ते आज कोणालाही भेटणार नाहीत. दिवसभर ते विश्रांती घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते आपल्या दरे गावात विश्रांती घेत आहेत. त्यानंतर डॉक्टरांचे एक पथक तातडीने दरे गावात पोहोचले आहे. शिंदे यांना नेमके काय झाले, हे डॉक्टर तपासणीनंतर सांगणार आहेत. दरम्यान राज्यात सरकार स्थापन होण्यासाठी विलंब होत असताना शिंदे अचानक दोन दिवसांसाठी आपल्या दरे गावात पोहोचले आहेत. त्यांनी आजच्या सर्व भेटीही रद्द केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते आपल्या दरे गावात विश्रांती घेत आहेत. त्यानंतर डॉक्टरांचे एक पथक तातडीने दरे गावात पोहोचले आहे. शिंदे यांना नेमके काय झाले, हे डॉक्टर तपासणीनंतर सांगणार आहेत. दरम्यान राज्यात सरकार स्थापन होण्यासाठी विलंब होत असताना शिंदे अचानक दोन दिवसांसाठी आपल्या दरे गावात पोहोचले आहेत. त्यांनी आजच्या सर्व भेटीही रद्द केल्या आहेत.
राज्यातील सत्तास्थापनेवरून राजकारणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मुख्यमंत्री पद जवळपास निश्चित झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार? हा पेच अजूनही आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद जाऊ शकते, मात्र एकनाथ शिंदे हे पद स्विकारणार नसल्याची माहिती आहे. त्याऐवजी ते श्रीकांत शिंदेंना संधी देऊ शकतात. याव्यतिरिक्त उदय सामंत, दादा भुसे, दीपक केसरकर, भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा होत आहे.
● ‘काळजीवाहू मुख्यमंत्रीपद असंवैधानिक’
मुंबई- काळजीवाहू मुख्यमंत्रीपद असंवैधानिक आहे, असे विधान कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री ही संकल्पना संविधानामध्ये नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
२६ नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपला. त्यामुळे सरकार लवकर स्थापन न झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. यावरूनच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘काळजीवाहू मुख्यमंत्री ही संकल्पना संविधानामध्ये नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे.’, असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले.