इंटरस्कूल डान्स फेस्टिव्हल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल 40 हजाराचे प्रथम बक्षीस पटकावले

सोलापूर : ‘ दृश्या – २K२४” इंटरस्कूल डान्स फेस्टिव्हल सत्र- २ च्या नृत्य स्पर्धेमध्ये सोलापूरच्या सिंहगड पब्लिक स्कूलने 40 हजार रुपयांचे प्रथम क्रमांक पटकावले आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांकडून उत्कृष्ट नृत्यकलेचे सादरीकरण केले. इतर जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.
बार्शीतील परमप्रसाद चॅरिटेबल सोसायटीच्या सेंट जोसेफ इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे “दृश्या २K२४” इंटरस्कूल डान्स फेस्टिवलच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा CBSE हब ऑफ लर्निंग अंतर्गत घेण्यात आली. यामध्ये सांगली, सातारा, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमधील CBSE शाळांनी भाग नोंदवला.
ही नृत्य स्पर्धा दोन विविध गटांमध्ये घेण्यात आली. ज्युनिअर गटाची (इयत्ता चौथी ते सातवी) थीम “मेरी माटी – मेरा देश” तसेच सिनियर गटाची (इयत्ता आठवी ते दहावी) थीम “सिनेमॅटिक” होती. या स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये 15 हून अधिक व सिनियर गटामध्ये 17 हून अधिक शाळांनी भाग घेऊन 550 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
ज्युनिअर गटामध्ये सोलापूरच्या सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “मेरी माटी – मेरा देश” या थीमवर आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने देशाप्रती प्रेम दाखवून प्रथम क्रमांक पटकावत स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये चाळीस हजार मिळविले. तसेच सिनियर गटातील विद्यार्थ्यांनी “सिनेमॅटिक” थीम साठी “खली बली” या गाण्यावर रोमांचक कामगिरी दाखवून विशेष प्राविण्यासह रोख रक्कम आठ हजार मिळविले.
संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सर यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, नृत्यप्रशिक्षकाचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. सिंहगड शाळेच्या या यशाद्वारे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून सिंहगड पब्लिक स्कूलचे नाव रोशन केले असा अभिमान व्यक्त केला. इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच शाळेचे प्रोत्साहन राहील असे आश्वासन संजय नवले यांनी दिले.
शाळेच्या प्राचार्या निखहत शेख यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले. त्याचबरोबर सिंहगड पब्लिक स्कूलच्या गौरवाने शाळेचे नाव उंचावले, अशी भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सिंहगड पब्लिक स्कूल नेहमीच करत आले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे नृत्यप्रशिक्षक सुदर्शन माने यांचे योगदान आहे. पालकांचेही शाळेला सतत सहकार्य लाभत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळते. तसेच सिंहगड पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य प्रकाश नवले आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.