
सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. महेश कोठे हे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. त्यावेळी कुंभमेळ्यात असताना महेश कोठे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महेश कोठे हे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे सदस्य होते. वयाच्या 55 व्या वर्षी महेश कोठे यांचे निधन झालं आहे. महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
थंडीत रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. महेश कोठे हे त्यांच्या काही मित्रांसह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. माहितीनुसार, त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सोलापुरात काँग्रेस मजबूत करण्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात कोठे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची होती.
सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला. महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती. राजकारणातील आणि समाज आणि राजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्या निधनाने सोलापूरमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे.
* अर्ध्यावरती डाव मोडला….
माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला.
सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक प्रभावी आणि खंबीर असं नेतृत्व काळानं असं अचानक हिरावून नेलं यावर खरं म्हणजे विश्वास बसत नाही कोठे परिवारावर हा मोठा आघात असून यातून सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो, अशी पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व… सोलापूरच्या वास्तववादी विकासाच व्हिजन असणारा मुरब्बी नेता काळाच्या पडद्याआड गेला सर्वांना सोबत घेऊन जाणारं सर्व समावेशक विचार मांडणारं प्रगतशील सोलापूरचं स्वप्नं पाहणारं आणि कृतीला महत्व देणारं नेतृत्व नाहीसं झालं खऱ्या अर्थान सोलापूरसाठी हा राजकीय पोकळी निर्माण करणारा प्रसंग म्हणावा लागेल… महेश अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.. आमदार होण्याचे आणि सोलापुरात आयटी पार्क उभारण्याचे महेश अण्णा कोठे यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
अण्णांची कोठे घराण्यात कोणीतरी आमदार व्हावे, थोडक्यात आपणच आमदार व्हावी, तसेच सोलापूर (डोणगाव रोडवर) आयटी पार्क वसविण्याची इच्छा होती. शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले. पण नियतीने घाला घातला. आताच्या विधानसभा निवडणुकीत कार्य असून ही महेशअण्णांना पराभवाचा सामना करावा लागला. पण अनपेक्षितपणे पुतण्या देवेंद्र कोठे विजयी झाल्याने अण्णा सुखावले होते. देवेंद्र कोठेंच्या रूपाने कोठे घराण्यात पहिला आमदार झाला. आता देवेंद्रच आयटी पार्क चे अण्णांचे स्वप्न पूर्ण करतील.
ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्यानंतर महेश कोठे यांनी सोलापुरात आपला राजकीय धबधबा निर्माण केला होता. गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.
अनेक निवडणुका महेश कोठे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि मग त्यानंतर सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते.